लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, जिम ट्रेनर बनला चोर
पुणे | लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर झाला आहे. काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर काहींचे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. यातून आलेल्या नैराश्यातून काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत तर काहीजण गुन्हेगारीकडे वाढले आहेत.पुण्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यानंतर एका जिम ट्रेनर ने पत्नीच्या मदतीने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. एका सराफी दुकानातून मंगळसूत्र चोरल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.बाळासाहेब प्रदीप कुमार हांडे (वय 35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजेश गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. रास्ता पेठेतील परमार ज्वेलर्समध्ये 30 नोव्हेंबर रोजी चोरीचा हा प्रकार घडला होता.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, समर्थ पोलीस ठाण्यात सराफा दुकानात वर मंगळसूत्र चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी एका दुचाकीवर जाताना दिसला. दुचाकीच्या आधारे पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली. आरोपी बाळासाहेब हांडे हा 30 नोव्हेंबर रोजी पतीला घेऊन परमार ज्वेलर्स मध्ये आला होता. यावेळी त्यांनी दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने एक लाख बावीस हजार रुपयाचे मंगळसूत्र चोरून गेल्याचे निष्पन्न झाले.
बाळासाहेब हांडे हा एका जिममध्ये ट्रेनिंग देण्याचे काम करत होता. कोरोनानंतर लॉकडाऊन लागले आणि जिम बंद पडली. त्यानंतर उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्याने त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करण्यासाठी त्याने पत्नीलाही सोबत नेले होते. त्यानंतर सेल्समनचे लक्ष दुसरीकडे विचलित करून त्याने ही मंगळसूत्र चोरी केली आहे.