जांभूळ गावात प्लास्टिकमुक्त उपक्रमाचा शुभारंभ; ग्रामस्थांमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उपक्रम; प्रशासन व स्थानिक नेतृत्वाचा पुढाकार
मावळ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्लास्टिक मुक्त गाव उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी जांभूळ गावात मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील ग्रामस्थांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच पै. अंकुशभाऊ काकरे युवा मंच , रोहित माणिकराव काकरे आणि संदिप ईश्वर काकरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, मावळ पंचायत समितीचे तहसीलदार श्री. विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी श्री. कुलदिप प्रधान, प्रकल्प संचालक सौ. शालिनी कडू, जांभूळ ग्रामपंचायत ग्रामसेविका कल्याणी लोखंडे, तसेच माजी आदर्श सरपंच श्री. संतोषभाऊ जांभुळकर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पूर्ण झाला.
हेही वाचा : लाडकी बहीण व शेतकऱ्यांच्या योजना कधीही बंद होणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमास उपसरपंच एकनाथ गाडे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत ओव्हाळ, दत्तात्रय जांभुळकर, बाळकृष्ण काकरे, योगेश काकरे, बाळु आंबेकर, राजेंद्र राऊत, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
“प्लास्टिकमुक्त गाव हा केवळ उपक्रम नाही, संकल्प” — मुख्य कार्यकारी अधिकारी
यावेळी बोलताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले,
“प्लास्टिकचा वापर थांबवणे म्हणजे फक्त स्वच्छता नव्हे तर पर्यावरणाचे रक्षण आहे. जांभूळ गावाने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. भविष्यातील पिढ्यासाठी स्वच्छ, हिरवे आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरेल.”
या उपक्रमामुळे जांभूळ गाव प्लास्टिकमुक्त गावाकडे एक पाऊल पुढे टाकत असून, ग्रामस्थांचा उत्साह पाहता हा उपक्रम भविष्यात मोठ्या प्रमाणात विस्तारू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





