जेजुरीत जय गंगामय्या! बिहारी बांधवांनी जल्लोषात साजरी केली छठ पूजा
सूर्याला अर्घ्य देत जयाद्रीखोऱ्यात गुंजला “जय गंगामय्या”चा नारा

पुरंदर । विजयकुमार हरिश्चंद्रे
जयाद्रीखोऱ्यातील ऐतिहासिक जेजुरी नगरीत ‘जय गंगामय्या, खंडोबा महाराज की जय’ अशा गगनभेदी जयघोषात बिहारी बांधवांनी पारंपरिक उत्साहात छठ पूजा साजरी केली. संपूर्ण देशातील विविध राज्यांप्रमाणेच जेजुरीतील पेशवे तलाव, मल्हारसागर धरण, होळकर तलाव परिसरात शेकडो भाविकांनी सूर्यदेवतेची आराधना करून हा पवित्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पाडला.
छठ पूजेच्या निमित्ताने महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या विधीत स्त्रिया कठोर व्रत पाळत उपवास करतात. उगवत्या आणि मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून सूर्यदेवतेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी परिसर स्वच्छ करून भाविकांनी पारंपरिक पद्धतीने पूजा मांडली, छठ पूजेची गाणी गात भक्तीभावाने सूर्यदेवतेचे स्मरण केले.

हेही वाचा : शिवविवाहात अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थिनीला शिक्षणासाठी ५१ हजारांची मदत
वैदिक परंपरेशी जोडलेला हा सण महाभारतातील उल्लेखांपर्यंत पोहोचतो. पांडव व द्रौपदी यांनी राज्य पुनर्प्राप्तीसाठी सूर्याची आराधना केल्याची आख्यायिका प्रचलित आहे. सूर्योपासनेतून मिळणारी ऊर्जा, मानसिक स्थैर्य व आरोग्यलाभ या सणामागील वैज्ञानिक दृष्टिकोनही भाविकांनी मांडला.
पूजेच्या साहित्यांत फळे, नारळ, ऊस, खजूर, केळी, गूळ व ठेकुआचा समावेश होता. कांदा, लसूण व मसाले यांचा वापर मात्र टाळण्यात आला. चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून व्रताची सांगता करण्यात आली व प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली.
या प्रसंगी बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच महाराष्ट्रातील कामानिमित्त येथे स्थायिक झालेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेजुरी नगरीतील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते जयदीप बारभाई, सचिन पेशवे, गणेश निकुडे, अलका शिंदे, गणेश भोसले, सचिन सोनवणे, संदीपअप्पा जगताप, रोहिदास कुंभार आदींनी छठ पूजेच्या निमित्ताने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. संपूर्ण जयाद्रीखोऱ्यात सूर्याला अर्घ्य देत “जय गंगामय्या”चा नारा घुमला आणि भक्तिभाव, निसर्गपूजा व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवास आला.




