राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? सत्तेची इतकी लालसा आहे की…- चंद्रकांत पाटील
![Is the NCP's head still in place? There is so much lust for power that… - Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Sharad-pawar-and-chandrakant-patil.jpg)
पुणे |
“माध्यमांवरील बातमीनुसार, शरद पवार यांनी खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अनिल देशमुख यांच्यासंदर्भातील कारवाईबद्दल चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना आज दिल्लीत बोलावले. राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल(शनिवार) मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे, सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. आज पुण्यात देखील आंदोलन करण्यात आले. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
तसेच, “तुमच्या गृहमंत्र्यांना महिन्याला १०० कोटींची वसुली हवी आहे, ही बातमी आणि पुरावे डीजी पद असणारा अधिकारी लेखी सादर करत असूनही तुम्ही देशमुखांवर काय कारवाई करावी याची अजून चर्चा करत आहात ? सत्तेची इतकी लालसा आहे की, आपण महाराष्ट्रससुद्धा विकायला तयार झाला आहात ?” असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून केले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असेल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “शरद पवार यांची भूमिका हास्यास्पद असून आठवीच्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल, की हे सरकार पवार चालवतात. त्यामुळे न समजणारी पहिल्या सारखी दुधखुळी जनता राहिलेली नाही, यामुळे हे सर्व नाटक बंद करा.”
वाचा- सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? शिवसेना, मुख्यमंत्री की शरद पवार? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल