पुण्यात पुन्हा संपूर्ण कुटुंब कोरोनानं संपवलं, आई-वडिलांसह दोन भावांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/kuchekar-family-e1619200131492.jpg)
पुणे – महाराष्ट्रात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पुण्यातील अख्ख कुटुंब कोरोनामुळे संपल्याची घटना घडली होती. आता परत एकदा त्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. एकाच कुटुंबातील तब्बल चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे.
पुणे महानगरपालिकेत आरोग्य कर्मचारी म्हणून काम करत असताना पुण्यातील कुचेकर कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आणि एक-एक करत अवघ्या 15 दिवसात घरातील सर्वांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला. लक्ष्मण कुचेकर यांचे निधन 9 एप्रिल रोजी झालं तसेच त्यांची पत्नी सुमन कुचेकर यांचं कोरोनामुळे 16 एप्रिलला निधन झालं.
आई-वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरत नाही तोच काल कुचेकर कुटुंबातील दोन सख्खे भाऊ शामसुंदर कुचेकर व विजय कुचेकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी पुण्यामध्ये घडली. एकाच कुटुंबातील चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही पहायला मिळत आहे.
15 दिवसांच्या कालावधीत एकाच कुटुंबातील चार जणांचा कोरोनामुळे नाहक बळी जात असल्याने परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. श्यामसुंदर कुचेकर यांचे वडील लक्ष्मण कुचेकर यांनी शिवाजीनगरच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये अखेरचा श्वास घेतला तर त्यांच्या पत्नी सुमन कुचेकर यांनी जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू असताना आपला प्राण गमावला. त्यानंतर, दोन भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. अशा प्रकारच्या गंभीर आणि दुर्दैवी घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेऊन शासनाच्या नियमांचं पालन करणं आणि कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.