पुण्यात कंपनी मालकाच्या नावे दोन कोटींचे कर्ज, फसवणूक प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा
![In Pune, a case has been filed against two in the case of two crores loan and fraud in favor of the company owner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/eed716a3-0ff1-4ddc-9050-9c465ac0cd03-780x470.jpg)
पुणे : खासगी कंपनी चालविण्यास घेऊन कंपनी मालकाच्या नावावर दोन कोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुष्कर राजेंद्र वांगीकर (वय ३३, रा. पंढरपूर, जि. सोलापूर), पुष्कर मोहन टापरे (वय ४०, रा. प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयश्री श्रीकांत नागपूरकर (वय ६५, रा. अभिनव सोसायटी, सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
जयश्री यांच्या नावावर विनय इन्फास्ट्रक्चर कंपनी आहे. त्यांचे पती श्रीकांत जयश्री इलेक्ट्रोमेक कंपनीचे मालक आहेत. या दोन्ही कंपन्या वांगीकर आणि टापरे यांनी चालविण्यास घेतल्या. नागपूरकर यांच्या कंपन्यांच्या नावे दोघांनी गणेशखिंड रस्त्यावरील एका बँकेकडून दोन कोटी पाच लाख रुपयांचे कर्ज काढले. कर्ज घेतल्यानंतर परतफेड केली नाही. कर्जापोटी घेतलेली रक्कम त्यांनी वापरली. नागपूरकर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.