पुण्यात ई-कचरा व्यवस्थापनासाठी ‘ग्रीन बाईट’ प्रकल्पाची अंमलबजावणी

पुणे: पुणे शहरातील वाढत्या ई-कचऱ्याच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि आयसीएलईआय लोकल गव्हर्नमेंट सस्टेनेबिलिटी, साऊथ एशिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग््राीन बाईट’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. ई-कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम, कार्यक्षम आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
हा प्रकल्प महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच अतिरिक्त आयुक्त (ज) पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अविनाश सकपाळ, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार यांच्यासह आयसीएलईआय साऊथ एशियाचे कार्यकारी संचालक इमानी कुमार आणि संचालक सौम्या चतुर्वेदुला या उपक्रमात सहभागी आहेत.
हेही वाचा – “मराठी तरुणांची मानसिकता…”; शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने नवा वाद
’ग््राीन बाईट पुणे’ उपक्रमाचा मुख्य उद्देश ई-कचरा प्रशासनातील सध्याच्या तफावती ओळखून त्या दूर करणे तसेच शहरासाठी एक प्रभावी आणि नियोजनबद्ध ई-कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारणे हा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ई-कचऱ्याच्या संकलनापासून ते पुनर्वापर व पर्यावरणपूरक विल्हेवाटीपर्यंतची संपूर्ण साखळी अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी सांगितले की, पुणे शहराची लोकसंख्या सध्या सुमारे 70 ते 80 लाखांच्या दरम्यान आहे. पुणे महापालिकेचे कार्यक्षेत्र सुमारे 516 चौ. किलोमीटर इतके विस्तीर्ण आहे. शहरात माहिती-तंत्रज्ञानाचा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून, त्यातून निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे.
या ई-कचऱ्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन यांसारख्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश होतो. या प्रकारच्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नाही तर त्यातून गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन पुणे मनपामार्फत ई-कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी ‘ग््राीन बाईट’ प्रकल्प राबविण्यात येत असून, भविष्यात या माध्यमातून शहरातील ई-कचरा व्यवस्थापनात ठोस सुधारणा घडवून आणण्याचा मानस असल्याचेही सकपाळ यांनी स्पष्ट केले.




