माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार; अजित पवार यांच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का

बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उतरले आहेत. माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. अजित पवार यांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात आदर्श म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. यंदाची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक मानले जात आहे, त्याचे कारण ही तसेच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या निवडणुकीत ब वर्ग प्रवर्गातून निवडणुकीस सामोरे जात आहेत. नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून अजित पवार ही निवडणूक लढत आहेत.
अजित पवार आज चेअरमन म्हणून कोणाचे नाव घोषित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पाहुणेवाडी तालुका बारामती येथील प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार असे जाहीर केले. यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी आपण प्रचाराच्या नारळाच्या दिवशीच चेअरमन जाहीर करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार अजित पवार यांनी आज चेअरमन म्हणून स्वतःचेच नाव जाहीर केले.
हेही वाचा – राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम; वृक्षारोपण संपन्न
त्यामुळे मळेगावची निवडणूक रंगतदार होणार हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे अजित पवार यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री जरी या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे असले तरी देखील विजय आपलाच असल्याचा विश्वास या गुरु शिष्याच्या जोडीने देखील सभासदांना दिला आहे.
बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून शरद पवार गटाने देखील या निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. या गटाने भक्कम पॅनलची बांधणी केली असून बळीराजा सहकारी बचाव पॅनलच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.