पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याने दिला ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे : शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या मुसळधार सरी पडत असून, पुढील दोन दिवसांमध्ये पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे घाटमाथ्यासह शहरातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आली.
शनिवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये शिवाजीनगर येथे ३७ मिलिमीटर पाऊस पडला होता. सर्वाधिक पाऊस लोणावळा येथे २४१.५ मिमी कोसळला. शहरातील एनडीए भागात ५६.५ आणि पाषाणमध्ये ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली.
हेही वाचा – रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर, नद्यांना पूर
रविवारी पहाटेपासून सरींवर सरी पडत होत्या. शिवाजीनगर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १६.६ मिमी पाऊस नोंदला.
जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही भागात सोमवार (ता. १५) आणि मंगळवारी (ता. १६) अतीमुसळधार पावसाच्या सरी पडणार आहेत. तसेच, सपाट भागावर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडणार असल्याने हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणात २ जुलैला ४.५५ टीएमसी पाणीसाठा होता. रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो १०.१२ टीएमसीपर्यंत वाढला असल्याची माहिती मिळाली.