हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग रुंदीकरणाला गती
तब्बल ६,२५० कोटींच्या निविदा जाहीर

वाहतूक समस्यांवर मिळणार दिलासा
पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSRDC) या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. या कामांना राज्याचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने विशेष प्राधान्य दिले असून, दोन स्वतंत्र भागांमध्ये ही विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.
हडपसर-यवत सहापदरी महामार्गासाठी ३,१४६.८५ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, या रस्त्यामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील वाहतूक प्रवाहाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, तळेगाव-चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर चाकणपर्यंत चारपदरी आणि पुढे सहापदरी रस्त्यासाठी ३,१२३.९२ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २६ जुलैपर्यंत अल्टीमेटम’; सुप्रिया सुळे
तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि यवत हे परिसर औद्योगिक आणि निवासी दृष्टिकोनातून झपाट्याने विकसित होत असून, वाढत्या वाहन संख्येमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्र, वसाहती, आयटी हब आणि नागरी वस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढून वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कामाला सुरुवात व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरीक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. या विकासकामांमुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळणार असून, दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. पुणे, रायगड, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यातील नागरिकांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणामुळे पुणे जिल्ह्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. विशेषतः चाकण, शिक्रापूर, तळेगाव औद्योगिक वसाहती आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकारने हे प्रकल्प वेगाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. निविदा प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला तातडीने सुरुवात व्हावी, ही आमची आग्रही मागणी आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.