‘पूरस्थिती रोखण्यासाठी निधी आणला’; माधूरी मिसाळ

पुणे : आंबील ओढा परिसरासह, पर्वती विधानसभा मतदारसंघातील नाल्यांच्या बाजूला असलेल्या रहिवासी वस्तीतील पूरस्थिती रोखण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून २०० कोटींचा निधी आणला. तसेच, केंद्रशासनाने शहरात पावसाळ्यात उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन शहरीपूर व्यवस्थापनासाठी महापालिकेस ३५० कोटींचा निधी दिला जाणार असून या निधीतूनही मतदारसंघात विकासकामे केली जाणार असल्याचे आमदार माधूरी मिसाळ यांनी सांगितले.
बिववेवाडी परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. वर्षा साठे, रूपाली धाडवे, भीमराव साठे, पिंटू धाडवे, मीनानाथ पराडकर, महेश कुंभार, राखी शिंदे , महेश कुंभार, संतोष नांगरे, अविनाश खेडेकर, विनीत पिंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘चुकीला माफी होऊ शकते, पण गद्दारीला माफी नाही’; खासदार अमोल कोल्हेंची टीका
मिसाळ म्हणाल्या की, आंबील ओढ्याला पूर आल्याने सहकार नगर अरण्येश्वर ओढ्यालगत सिमाभिंत बांधणे गरजेचे होते, तर, खासगी सोसायट्यांमध्ये शासनाच्या निधीतून कामे होत नसल्याने अडचण होती. या भिंती बांधून देण्याची मागणी नागरिक करीत होते. आपत्तीत भिंती पडल्याने ती बांधून देण्याची जबाबदारी महापालिका आणि सरकारची असल्याची भूमिका मांडली. मात्र तशी तरतूद नसली तरी विशेष बाब म्हणून भिंती बांधण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यानुसार राज्य शासनाने २०० कोटींचा निधी दिल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.





