संगम घाट परिसरात श्वानांची पाच पिले मृतावस्थेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/dog-puppy-780x461.jpg)
मुळा, मुठा नदीच्या संगमावर दशक्रिया विधी केले जातात. चार दिवसांपूर्वी संगम घाट परिसरात श्वानाची पाच पिले मृतावस्थेत सापडली. पिलांच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव झाला होता. पिलांना अन्नपदार्थांतून विषबाधा झाल्याचा संशय घाटावरील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. असे प्रकार यापूर्वी संगम घाट परिसरात घडल्याचे सांगण्यात आले. भटक्या श्वानांना अन्नपदार्थांतून विष देऊन मारण्याच्या घटना यापूर्वी शहरातील वेगवेगळ्या भागात घडल्या आहेत.
भटक्या श्वानांच्या त्रासामुळे तसेच अंधश्रद्धेतून श्वानांना मारण्याचे प्रकार घडतात. दरवर्षी नेमक्या किती श्वानांंचा मृत्यू होतो? याची माहिती देणे अडचणीचे ठरत असल्याने प्रशासनाकडून जाहीर दिली जात नाहीत. असे प्रकार रोखण्यासाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या घटनांबत प्राणीप्रेमी व स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून समाजात जागरूकता व सजगता निर्माण केली पाहिजे, असे पीपल्स फाॅर ॲनिमल्स संघटनेच्या सदस्य कल्याणी शहा यांनी सांगितले.