निवडणुकीसाठी पालिकेचे साडेपाच हजार कर्मचारी

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार महापालिकेकडून सुमारे साडेपाच हजार कर्मचारी देण्यात आले आहेत. तर पाणीपुरवठा, आरोग्य, मलनि:सारण तसेच इतर काही विभागांचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या कामातून वगळण्यात आले आहेत.
आचारसंहिता लागू झाल्याने या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नेमून दिलेल्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.पालिकेतर्फे निवडणूक कामकाजासाठी कर्मचारी पाठवले जातात. यात कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचीही तरतूद आहे.
हेही वाचा – ‘वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं, आता..’; संजय राऊतांची सरकारवर टीका
त्यानुसार विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळून सुमारे ५ हजार ३२० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध करून दिला आहे.महापालिकेतर्फे पालिकेच्या विविध विभागांतील ३ हजार १३०, प्राथमिक शिक्षण विभागाकडील २,००७ आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडील १८३ शिक्षक व कर्मचाऱ्यांची निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.




