दोन दिवसीय पहिले ‘रोटरी मराठी साहित्य’ संमेलन पुण्यात

पुणे : केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, मराठी वाचन संस्कृतीचे जतन व्हावे, ती प्रवाहित राहावी या संकल्पनेतून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे ४ आणि ५ जानेवारी रोजी पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी प्रांतपाल शीतल शहा, संयोजन समिती कार्याध्यक्ष राजीव बर्वे, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हे संमेलन होणार असून संमेनलाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील असणार आहेत. तर सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. यामध्ये उद्घाटन, समारोप समारंभासह साहित्यिक चर्चा, विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती, गप्पा, कविसंमेलन, प्रहसने, सांगीतिक कार्यक्रम तसेच संगीत नाटक अशा विविध उपक्रमांचा समावेश यामध्ये असणार आहे.
हेही वाचा – ‘रोहयो’च्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी अमोल पवार यांची निवड
संमेलनाचे उदघाटन ४ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, जयंत भावे, उपप्रांतपाल मोहन पालेशा, डि. लर्निंग जिल्हा प्रशिक्षक पंकज शहा, संतोष मराठे, नितीन ढमाले आदी उपस्थित राहणार आहेत.