पुण्यात ‘माजी सैनिक किसान एकता शिखर संघा’ची स्थापना; ४०० प्रतिनिधींचा एल्गार
अण्णा हजारे यांचा आशीर्वाद, किशोरराजे निंबाळकर यांचे प्रशासकीय सहकार्याचे आश्वासन

पुणे : राज्यातील माजी सैनिकांचे हक्क, तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी ‘माजी सैनिक किसान एकता शिखर संघ – महाराष्ट्र राज्य’ या नव्या शिखर संघटनेची पुणे येथे उत्साहात स्थापना करण्यात आली. पुणे–आळंदी रोडवरील श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर परिसरात झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात राज्यभरातील सुमारे ४०० माजी सैनिक पदाधिकारी व प्रतिनिधींनी एकजुटीने संघर्ष उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा निवृत्त आयएएस अधिकारी किशोरराजे निंबाळकर उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी या नव्या चळवळीला आपला पाठिंबा व आशीर्वाद दिला असून, त्यामुळे संघटनेला नवे बळ मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार – निंबाळकर
अध्यक्षीय भाषणात किशोरराजे निंबाळकर म्हणाले, “देशसेवा करून नागरी जीवनात परतलेल्या माजी सैनिकांना अनेक प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन सिंहाचा वाटा उचलेन.” राज्यातील सर्व माजी सैनिक संघटनांनी एकत्र येऊन संघटितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा – EVM ला नव्याने बसवले जाणारे ‘पाडू’ मशीन नेमकं काय? कसं करणार काम?

राज्य कार्यकारिणी जाहीर
या वेळी संघटनेची राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. नवनियुक्त प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत —राज्य अध्यक्ष: हवालदार (नि.) शिवाजी ज्ञानदेव कदम, उपाध्यक्ष: सुबेदार मेजर (नि.) पांडुरंग भोसले, सचिव: हवालदार (नि.) देविदास रघुनाथ साबळे, कोषाध्यक्ष: हवालदार (नि.) ज्ञानदेव बाबुराव देवखिळे, कोअर कमिटी अध्यक्ष: सुबेदार मेजर (नि.) जगन्नाथ राधु खामकर, सदस्य: श्रीकृष्ण श्रीपत बंगाळे (नि.)
विभागीय जबाबदाऱ्यांचे वाटप
कार्यक्रमात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. माजी सैनिकांच्या प्रश्नांसाठी ही संघटना प्रामाणिकपणे व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




