पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांमुळे आगीच्या ७६ घटना; दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्याचे स्थायी समिती बैठकीत निर्देश
अग्निशमन विभाग अधिक अद्ययावत करण्यावर भर; महापालिका अग्निशमन दलाच्या कामगिरीचे कौतुक

पिंपरी चिंचवड: शहरात नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीच्या पर्वावर फटाक्यांमुळे आगीच्या तब्बल ७६ घटना घडल्या असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले आहेत. शहरामध्ये ज्यांच्यामुळे किंवा ज्यांच्या दुर्लक्षामुळे आगीच्या या घटना घडल्या आहेत, अशा सर्व संबंधितांवर महापालिकेच्या वतीने तात्काळ आणि कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दिवाळी आणि लक्ष्मीपूजनोत्सवादरम्यान शहरात घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष आढावा बैठकीत ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत बोलताना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी महापालिका अग्निशमन दलाच्या तत्परतेचे आणि उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले, परंतु भविष्यात अशा घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी अग्निशमन विभाग अधिक वेगाने आणि आधुनिक यंत्रणेसह अद्ययावत करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
हेही वाचा – संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भव्य ‘संविधान सन्मान दौड’!
यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे शहरात आगीच्या एकूण ७६ घटना नोंदवल्या गेल्या असून, यातील जवळपास ९० टक्के घटना या फटाक्यांमुळे (विशेषतः रॉकेट आणि उंचावर उडणारे फटाके दुसऱ्यांच्या घरात, मैदानात किंवा गॅलरीत गेल्यामुळे) घडल्याचे समोर आले आहे. ज्या इमारतींमध्ये किंवा फ्लॅट्समध्ये अशा दुर्घटना घडल्या, त्या सर्व संबंधित मालक व दोषी व्यक्तींवर विभाग म्हणून कसलीही दिरंगाई न करता तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले. तसेच शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा अधिक बळकट करणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रसामग्रीत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे.
या प्रसंगी आपली भूमिका मांडताना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, दिवाळीत शहरात फटाक्यांमुळे आगीच्या ७६ हून अधिक घटना घडल्या आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. जरी आपल्या अग्निशमन दलाने त्यावर त्वरित नियंत्रण मिळवून मोठे नुकसान टळले असले, तरी नागरिकांच्या जीविताशी आणि सुरक्षेशी खेळणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही. ज्यांच्यामुळे व ज्यांच्या दुर्लक्षामुळे या आगीच्या घटना घडल्या आहेत, अशा दोषींवर महापालिकेने तातडीने गुन्हे दाखल करावेत. तसेच अग्निशमन यंत्रणा आणि यंत्रसामग्री अधिक अत्याधुनिक करून विभागाला पूर्णपणे सज्ज ठेवावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता येईल.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”दिवाळीत शहरात फटाक्यांमुळे आगीच्या ७६ हून अधिक घटना घडल्या आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. जरी आपल्या अग्निशमन दलाने यावर त्वरित नियंत्रण मिळवून मोठे नुकसान टळले असले, तरी नागरिकांच्या जीविताशी आणि सुरक्षेशी खेळणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही. ज्यांच्यामुळे व ज्यांच्या दुर्लक्षामुळे या आगीच्या घटना घडल्या आहेत, अशा दोषींवर महापालिकेने तातडीने गुन्हे दाखल करावे. तसेच अग्निशमन यंत्रणा आणि यंत्रसामग्री अधिक अत्याधुनिक करून विभागाला पूर्णपणे सज्ज ठेवावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता येईल.”
– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.




