समता, स्वातंत्र्य, बंधुत्व मूल्ये वारकरी परंपरेत: शामसुंदर सोन्नर महाराज
![Equality, Freedom, Fraternity Values in Warkari Tradition: Shamsundar Sonnar Maharaj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-06-at-10.56.55-AM-1-780x470.jpeg)
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त आयोजित ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या कीर्तनाला मंगळवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. गांधी भवन(कोथरूड) येथे मंगळवारी, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले, नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
अन्वर राजन, येवले महाराज, विनायक महाराज, सचिन पांडुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत तुकारामांच्या ‘विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म,भेदाभेद अमंगळ ‘ या अभंगाने सोन्नर यांनी कीर्तनाला सुरवात केली. संविधानातील समतेचा विचार या अभंगात असल्याचे त्यांनी सांगीतले.वारकऱ्यांची वाट प्रबोधनाची आहे. संतांचा संदेश आणि संविधानाचा संदेश यातील साम्य कीर्तनातून मांडणार असल्याचे त्यांनी प्रारंभी सांगितले.
तुकाराम महाराजांच्या ‘पापाची वासना नको दावू डोळा,त्याहूनी आंधळा बराच मी.निंदेचे श्रवण नको माझे कानी,बधीर करोनी ठेवी देवा.अपवित्र वाणी नको माझ्या मुखा,त्याहूनी मुका बराच मी. ‘ हीच भावना गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकात आहे.वारकरी संप्रदाय कोणत्याही जातीचा, पंथांचा, पक्षाचा नाही, संविधानही तसेच आहे. वारकरी संप्रदायात अनेक धर्मांचे संत होऊन गेले. त्यामुळे वारकरी संप्रदाय कोणा एका धर्माचाही नाही. सर्वांचा आहे. २२ मुस्लीम कीर्तनकार आजही महाराष्ट्रात आहेत, असे सोन्नर महाराजांनी सांगीतले.
चार वेद भेदभाव करणारे असल्याने तुकारामांची गाथा ही आपल्यासाठी पाचवा वेद आहे. भेद गाळून वेदातील चांगूलपणा घेऊन गाथा सिद्ध झाल्याने ती बुडाली नाही. पुढे गव्हर्नर ग्रँट अलेक्झांडर यांनी गाथा सरकारी खर्चाने प्रसिद्ध केली.
रंजल्या, गंजलेल्याची सेवा करणाराच संत असू शकतो, हा मंत्र तुकाराम महाराजांनी दिला. समाजातील सर्व घटकांबद्दल त्यांचे विचार पाहून ग्रँट अलेक्झांडर यांनी हा निर्णय घेतला, असे श्यामसुंदर सोन्नर यांनी सांगीतले.
महिलांबद्दल संतपरंपरेत आदराची भावना दिसून येते.
नामदेव महाराज यांनी नारदीय कीर्तन परंपरेतून अध्यात्मिक लोकशाही परंपरेचा पाया रचला.समता, स्वातंत्र्य, बंधुत्व , सामाजिक न्याय ही सर्व मूल्ये वारकरी परंपरेत,वारीत पहायला मिळतात, असेही ते म्हणाले.
गांधी सप्ताहात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे.७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.