पर्यावरणवादी कार्यकर्त्या कुसुम कर्णिक यांचे निधन
![Environmental activist Kusum Karnik passed away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/kusum-karnik-780x470.jpg)
पुणे: आदिवासी समाजासाठी लढा देणाऱ्या, सरकारच्या रोजगार हमी योजनेत ‘पडकई’ समाविष्ट करण्यासाठीचे आंदोलन करणाऱ्या, डिंभे धरण आदिवासींच्या ताब्यात देण्यासाठी चळवळ उभी करणाऱ्या ज्येष्ठ पर्यावरणादी कार्यकर्त्या आणि ‘शाश्वत’ संस्थेच्या संस्थापिका कुसुम कर्णिक (वय ९०) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा सौरभ आनंद कर्णिक-कपूर आणि सून कल्याणी सौरभ कर्णिक-कपूर असा परिवार आहे.
आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यात १९८० च्या काळात कुसुमताई आणि त्यांचे पती स्वर्गीय आनंद कपूर या दोघांनी मिळून स्थापन केलेल्या शाश्वत संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये भरपूर कामे केली. त्यामध्ये डिंभे धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न, पडकई योजना, हिरडा प्रश्न, आदिवासींचे खातेफोड, जातींचे दाखले, अभयारण्याचे प्रश्न, रोजगार हमी योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांनी मेधा पाटकर यांच्यासमवेत नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या संस्थेचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अत्यंत बहुमानाचा समजला जाणारा ’इक्वेटर इनिशिएटिव्ह’ हा पुरस्कार २०१२ मध्ये ‘शाश्वत’ संस्थेला मिळाल्यानंतर आंबेगाव तालुक्याचे नाव सात समुद्रापार पोहोचले.