उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
![Entrepreneur Gautam Pashankar's pre-arrest bail rejected by court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pashankar.jpg)
पुणे | पूर्ण पैसे भरूनही ग्राहकास फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश जी जी भालचंद्र यांनी हा आदेश दिला आहे. चंदन नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गौतम विश्वनंद पाषाणकर यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी महिपाल सिंह विजयसिंह ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान पाटणकर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ही त्यांचा अटक पूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पाषाणकर यांच्या प्रॉक्सीमा क्रिएशन या कंपनीच्या खराडी येथील प्रकल्पात फिर्यादी यांनी एक कोटी 56 लाख 63 हजार रुपये देऊन फ्लॅट खरेदी केला होता. पात्र फिर्यादीने फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. पाषाणकर यांनी हा फ्लॅट फिर्यादीना देण्यापूर्वी एका नागरी सहकारी पतसंस्थेकडे तारण ठेवून त्यावर दोन कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्यामुळे फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पाषाणकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. फिर्यादी यांच्या तर्फे एडवोकेट सागर कोठारी एडवोकेट नारायण पंडित यांनी बाजू मांडली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पाषाणकर यांची कोठडी आवश्यक आहे. त्यांनी अशा प्रकारे सदनिका विकण्या पूर्वी तारण ठेवून त्यावर कर्ज काढले काढले आहे का याचा तपास करायचा आहे त्यासाठी अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद ऍडव्होकेट कावेडिया यांनी केला होता.