breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राज्य सरकारकडून पुण्यातील गोखले इन्स्टीट्युटची लीड नॉलेज इन्स्टीट्युट म्हणून नेमणूक

पुणे : भविष्यात राज्याच्या विकासात्मक वाटचालीच्या दृष्टीने आवश्यक धोरणात्मक सल्ले आणि संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने पुण्यातील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेची महाराष्ट्र इन्स्टीट्युट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा)च्या वतीने लीड नॉलेज इंस्टीट्युट म्हणून  नेमणूक करण्यात आली. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) ही अशा प्रकारची देशातील पहिलीच संस्था आहे. मुंबई येथे ‘मित्रा’ या संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीदरम्यान महाराष्ट्र इन्स्टीट्युट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ अजित रानडे आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते.

याबद्दल अधिक माहिती देताना गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ अजित रानडे म्हणाले, “मित्रा या संस्थेकडून लीड नॉलेज इंस्टीट्युट म्हणून गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेची झालेली नेमणूक ही आमच्या दृष्टिने अत्यंत अभिमानाची बाब आहे. नजीकच्या भविष्यात राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने सरकारी धोरण तयार करणे आणि विकास धोरणे वाढवणे यासाठी योगदान देण्यावर आमचा भर असेल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीने पुढील 4-5 वर्षांत राज्याचा जीडीपी दुप्पट करण्यासंदर्भात सुचविलेल्या रोडमॅपची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रांत अगदी सूक्ष्म स्तरावर काम केले जाईल.”

हेही वाचा     –    वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावल्यास पडेल महागात! सरकार वसूल करणार ‘तब्बल’ इतकी जीएसटी 

यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट एक लीड नॉलेज इन्स्टिटय़ूट म्हणून कार्यरत असेल. यासोबतच आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठ, आयआयएम नागपूर या संस्थांचा सहभाग देखील या प्रकल्पामध्ये असेल. ‘मित्रा’च्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणे यांमध्ये आपले योगदान देईल. या सामंजस्य करारांतर्गत गोखले इंस्टीट्युटला आवश्यक सर्व मदत ही ‘मित्रा’कडून करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने संशोधकांची नेमणूक, संशोधनासाठीचे आर्थिक पाठबळ, पायाभूत सोयीसुविधा आदींचा समावेश आहे. या प्रक्रियेत गोखले इन्स्टिट्यूट ही संस्था ‘इंटलेक्च्युअल थिंक टँक’ म्हणून काम करेल अशी माहिती डॉ. अजित रानडे यांनी दिली.

या कराराद्वारे संशोधन, नाविन्यपूर्ण उपाययोजना यांच्या जोरावर राज्याच्या विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण क्षमतेने काम करू. ‘मित्रा’ आणि गोखले इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्था आपले उपयुक्त असे योगदान या प्रकल्पासाठी देतील, असा विश्वास ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी व्यक्त केला.

गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेविषयी – 1930 मध्ये स्थापन झालेली गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र ही संस्था देशभरात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधन आणि शिक्षणासाठी समर्पित एक अग्रगण्य संस्था आहे. समकालीन सामाजिक – आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बौद्धिक क्षमता आणि धोरणात्मक नवकल्पनांना चालना देणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

महाराष्ट्र इन्स्टीट्युट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा)बद्दल – महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले महाराष्ट्र इन्स्टीट्युट फॉर ट्रान्सफॉरमेशन हे नीती आयोगाच्या धरतीवर साकारेलेले मॉडेल आहे. देशातील राज्यांमध्ये शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास व्हावा या उद्देशाने ज्ञान आणि संशोधनावर मित्रा लक्ष केंद्रित करण्यासाठी कटिबद्ध असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button