पुण्यातील निर्बंध शिथिल : पुण्यात रात्री ८ पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
![Restrictions on immersion of Ganesha in Pune, see what are the rules](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Ajit-Pawar-Mask.jpeg)
पुणे । प्रतिनिधी
ज्या भागात बाधित रुग्णांचे प्रमाण एखादा टक्का राहीले आहे, तिथे निर्बंध शिथिल होतील. तसेच आस्थापने आणि हॉटेल्स आणि इतर व्यवहारांची वेळ ८ वाजेपर्यंत वाढविण्यात यावी, अशी चर्चा मागील बैठकीत झाली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा सकारात्मक राहिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली. वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महा मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
“करोनामुळे अनेक जण घरूनच काम करत आहेत. सोमवार ते शुक्रवार काम करतात, त्यांना खरेदी करता वेळ पाहिजे. त्या दृष्टीने शनिवार, रविवार जी सुट्टी आपण देतो त्यामध्ये रविवारी सुट्टी द्यावी आणि शनिवारी व्यवहार चालू राहावे, असा निर्णय घेण्याचा विचार करत आहोत. मात्र त्यावेळी सर्व नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. तसंच ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येवर ते म्हणाले की, “ग्रामीण भागात कोणीही मास्क वापरत नाहीत. मात्र पुण्यात नागरिक नियम पाळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासनाने कडक भूमिका घेतली पाहिजे. नागरिकांनी देखील स्वतः च्या आणि दुसर्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
“दुसऱ्यांच्या टीकेला मी किंमत देत नाही”
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी तुमच्यावर टीका केली आहे. त्यावर ते म्हणाले की, “कोणीही टीका करतं त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असतं. दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही”.
“अधिकारी म्हणाले दादा सात वाजता कार्यक्रम घ्या”
सध्या करोनाचं सावट आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून कमी लोकांमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे असे, आमचे नियोजन असते. पण कार्यक्रमावेळी गर्दी होते. त्यामुळे संयोजकांवर गुन्हा दाखल होतो. अशा घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. या कार्यक्रमाचा पुणेकरांना त्रास होता कामा नये या सर्व बाबी लक्षात घेता मेट्रो ट्रायल रनचा कार्यक्रम सकाळी सहा वाजता घेऊ या, असे ब्रिजेश दीक्षित यांना सांगितले. अहो, दादा सहा वाजता नको, सात वाजता कार्यक्रम घेण्यात यावा असे ते म्हणाले, त्यानुसार आज कार्यक्रम घेण्यात आला असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र ज्यावेळी पुढील मेट्रोचा कार्यक्रम भव्य दिव्य घेतला जाईल. तोवर करोना आजाराचे सावट नाहीसे झालेले असेल एवढीच आशा करुयात असंही ते म्हणाले.