#coronovirus:पुण्यात क्वारंटाईन केलेले 4 कोरोना संशयित विलगीकरण नजर चुकवून रुग्णवाहिकेतून फरार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/15-6.jpg)
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करणे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवणं अत्यावश्यक आहे. असं असतानाही पुण्यात क्वारंटाईन करण्यात आलेले चौघे संशयित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नजर चुकवून रुग्णवाहिकेतून फरार झाले आहेत. या चौघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या चारही संशयितांना निरिक्षणाखाली ठेवण्यासाठी सिंहगड कॉलेजच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आणण्यात आले होते. मात्र, त्याच दरम्यान हे चौघे येथून पळाले.
पुण्यातील बिबवेवाडी भागात तळजाई पठार येथे एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. यानंतर आरोग्य यंत्रणेने त्याच्याकडून इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत तात्काळ त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास केला. यात संबंधित चौघे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याचं स्पष्ट झालं होते. त्यामुळे या चौघांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना सिंहगड कॉलेजच्या क्वारंटाईन सेंटर येथे नेण्यात आले. तेथे गेल्यावर वैद्यकीय कर्मचारी संबंधितांना दाखल करुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत असतानाच या चौघांनी गेट जवळ असतानाच नजर चुकवून पळ काढला.
दरम्यान, काही नागरिकांनी सिंहगड कॉलेज येथील क्वारंटाईन सेंटरच्या स्वच्छता आणि सुविधेबद्दल प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर याबाबत काही व्हिडीओ देखील फिरत आहेत. यामुळेच संबंधितांना पळ काढल्याचीही चर्चा होत आहे. असं असलं तरी कोरोना संशयितांचा हा बेजबाबदारपणा अनेकांना कोरोना संसर्गाच्या धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताणही वाढताना दिसत आहे.