अक्षरधारा बुक गॅलरीच्यावतीने जी.ए यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत कार्यक्रमाचे आयोजन
![Concert organized by Akshardhara Book Gallery to commemorate the birth centenary of G.A](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/bb99b0b8-2680-4970-9e73-f473a0a0ac0c-780x470.jpg)
आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्य विश्वावर आपली नाममुद्रा प्रस्थापित करणारे प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांना आवडणाऱ्या शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत श्रवणाचा आनंद रसिकांनी शनिवारी लुटला. जी.ए.कुलकर्णी कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक गॅलरीच्यावतीने जी.ए यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी जी.ए यांच्या बहीण नंदा पैठणकर म्हणाल्या,की जी.ए त्यांच्या खोलीमध्ये टेपरेकाॅर्डरवर गाणी ऐकायचे. सरस्वती राणे यांचा ‘देसकार’, ‘मारुबिहाग’ मधील डाॅ. प्रभा अत्रे यांची ठुमरी, ‘का करू सजनी’ ही उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांची ठुमरी ते ऐकायचे. हा आनंद एकट्याने घेण्यापेक्षा सर्वांना द्यावा या उद्देशाने हा कार्यक्रम ठरवला. संगोराम म्हणाले,‘जी.ए यांच्या लेखनात सतत तंबोरा वाजत असतो याची प्रचिती येते. संगीत हे शब्दांच्या पलीकडचे काही सांगत असते. संगीतावरचे प्रेम शब्दातून पाझरत असल्याने त्यांचे साहित्य आपल्या मनात पुरून उरले आहे.’
अनुराधा मराठे यांनी ‘अजुनी रुसुनी आहे खुलता कळी खुलेना’,तर कौशिकी कलेढाणकर यांनी ‘माझिया माहेरा जा’ आणि ‘आला खुशीत समिंदर’ ही गीते सादर केली. अनुराधा कुबेर आणि अपर्णा केळकर यांनी शास्त्रीय रचना सादर केल्या. त्यांना दीप्ती कुलकर्णी यांनी संवादिनीची आणि कौशिक केळकर यांनी तबल्याची साथसंगत केली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, जी.ए यांच्या भगिनी नंदा पैठणकर, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.