कबुतर, पारव्यांना खाद्यदानमुळे शहराचे आरोग्य धोक्यात; महापालिकेकडून कारवाईचे आदेश
पुणे : कबुतरांच्या (पारव्यांच्या) पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुंमुळे फुप्फुसाशी संबंधित आजार (निम्युनिया) तसेच त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नये. अन्यथा कारवाई केली जाईल, असा आदेश पुणे महापालिकेने काढले आहेत. याबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थ टाकणाऱ्यांनो सावधान…तुमच्या खाद्यदानमुळे शहराचे आरोग्य बिघडत आहे.
शहरात कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ, धान्य टाकले जात आहे. राज्यातील अनेक महापालिकांनी याविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. अखेर पुणे महापालिकाही अॅक्शन मोडवर आले असून, आता महापालिकेने नागरिकांनी कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ टाकू नये, असे फलक लावण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र राजकारण: आज तिघांचाच शपथविधी; नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार
प्राणी, पक्ष्यांना अन्न किंवा धान्य टाकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारचे अन्नधान्य टाकले जाते. मात्र, कबुतरांसाठी टाकलेल्या धान्यामुळे कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर या कबुतरांची विष्ठा आणि पंख ठिकठिकाणी पडत आहे. यातून हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनियाचा आजार होत असून, हा फुप्फुसाशी संबंधित आहे. हा आजार होण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे.
पुणे शहर परिसरात कबुतरांचे (पारवे) थवेच्याथवे दिसून येतात. ठिकठिकाणी कबुतरांना धान्य टाकले जाते. त्यामुळे कबुतरांची संख्या वाढली असून, विष्ठा आणि पंख सर्वत्र पसरलेले दिसून येते. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर कसा होतो, याचा अभ्यास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहर परिसरातील ५ ते १२ वयोगटातील एक हजारच्या जवळपास मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ३७ टक्के मुलांना कबुतरांच्या विष्ठेतून पसरणाऱ्या बुरशीमुळे अॅलर्जी झाली तर ३९ टक्के मुलांना पंखामुळे अॅलर्जी झाल्याचं समोर आले.
कबुतरा (पारवे) यांना नागरिकांनी उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नये. टाकल्यास संबंधितावर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कारवाई करण्यात येईल.
– राजेंद्र भोसले, आयुक्त तथा प्रशासक, पुणे महापालिका