पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
पुणे – पुणेकरांनो, उद्या आणि परवा घराबाहेर पडण्याआधी पावसाचा अंदाज नक्की घ्या. कारण पुणे शहरात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस मुसळधार स्वरुपाचा असू शकतो. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पुण्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सर्दी, पडसे यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.
दरम्यान, मान्सूनचा पाऊस केरळच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 27 मे ते 2 जून या कालावधीत केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तर साधारण 1 जूनच्या आसपास मान्सूनचे केरळात आगमन होईल. त्यानंतर 8 ते 10 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येऊन स्थिरावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.





