विद्यमान आमदारांची उमेदवारी सुरक्षित? इच्छुकांना महामंडळाचे अध्यक्षपद बहाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Vilas-Lande-15-780x470.jpg)
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील आठ जागांवरील विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसच्या एका आमदाराचा समावेश आहे. ज्या मतदारसंघात आमदारांचा पक्षांतर्गत इच्छुकांशी लढा होता, त्या इच्छुकांना विविध मंडळांचे अध्यक्षपद देऊन आमदारांना उमेदवारीसाठी तरी सुरक्षित झोनमध्ये आणले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी जाहीर झाली. आता पुढची उत्सुकता उमेदवारी यादीची आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे जागावाटप आणि उमेदवारी यादी अंतिम टप्प्यात असून, या आठवडाअखेरपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यात पुणे शहरात विधानसभेचे जे आठ मतदारसंघ आहेत, त्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसकडील वडगाव शेरी व हडपसरच्या विद्यमान आमदारांचा अपवाद वगळता अन्य सहा मतदारसंघांत उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र, आता जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यात प्रामुख्याने कोथरूडचे भाजपचे आमदार व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची औपचारिकताच शिल्लक राहिली असल्याचे सांगण्यात आले.
शिवाजीनगर मतदारसंघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनाही पक्षात मातब्बर असा स्पर्धक नसल्यानेही त्यांचेही नाव जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगण्यात आले. पर्वती मतदारसंघात माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी उमेदवारीसाठी या वेळेस जोरदार ताकद लावली होती. मात्र, पक्षाने त्यांना राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद देऊन आमदार माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा केला असल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – मिशन विधासनभा: भोसरीकरांचा तुम्ही अपमान केला; आमचा स्वाभिमान दुखावला!
तर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांचीही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करून भाजपने आमदार कांबळे यांना ग्रीन सिग्नल दिला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पक्षातील माजी नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. मात्र, सध्या तापकीर यांच्याप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात जनसंपर्क असलेला चेहरा इच्छुकांमध्ये आहे. त्यामुळे तापकीर यांच्या उमेदवारीसाठी अडथळ्यांची शर्यत असली तरी तेच उमेदवार असतील, असे भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांना पक्षात स्पर्धकच नाही. त्यामुळे तुपे यांची उमेदवारीही निश्चितच मानली जात आहे. वडगाव शेरी मतदारसंघातही हेच चित्र आहे. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादीकडे कायम राहिल्यास आमदार सुनील टिंंगरे हेच उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट आहे.
काँग्रेसचा एकमेव आमदार असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातही आमदार रवींद्र धंगेकर हेच पुन्हा उमेदवार असतील, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे सध्यातरी आठही जागांवरील विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी जास्त झगडावे लागणार नसल्याचे चित्र आहे. आयत्या वेळी राजकीय समीकरणे बदली, तरच अपवादाने एखाद्या आमदाराची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. तूर्तास तरी सर्व आमदार उमेदवारीच्या डेंजर झोनच्या बाहेर असल्याचे चित्र आहे.