‘म्युकरमायकोसिस’वर उपचारांसाठी पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय
![Pune Municipal Corporation has nothing to do with Ambil Odha action: Mayor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Murlidhar-Mohol-Pune-1.jpg)
पुणे – कोरोनातून बरे झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. या म्युकरमायकोसिसवरील उपचारही महागडे आहेत. यावर उपचार घेणे सर्वसामान्य रुग्णाला परवडावे म्हणून पुणे शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत केला आहे. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसवर उपचारांसाठी 15 बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेनं घेतला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य शहरी गरीब योजनेतून संबधित रुग्णांच्या बिलावर दिले जात होते. मात्र आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा यात समावेश करुन फक्त म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी ही मर्यादा 1 लाखांवरुन 3 लाख रुपयांपर्यंत वाढण्यात आली आहे.
म्युकरमायकोसिसवर उपचारांसाठी 15 बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेनं घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्या दळवी रूग्णालयात 15 बेड हे म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना या ठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत करण्यात देखील आले आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांना सज्ज राहण्यास देखील सांगण्यात आलं आहे.
कोरोनावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी म्युकरमायकोसिसबाबतीत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.