काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पुणे फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे नेते शुक्रवारी उपस्थित राहणार
![Bharatiya Janata Party leaders will be present on the platform of the Pune Festival, which was started on the initiative of former Congress MP Suresh Kalmadi, on Friday.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/6966178a-7481-4500-a68a-ad49a0efb393.jpg)
पुणे : काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पुणे फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे नेते शुक्रवारी उपस्थित राहणार आहेत. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून काँग्रेसने ‘दूर लोटलेले’ तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी भारतीय जनता पक्षाबरोबरच ‘जवळीक’ साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह स्थानिक भाजप नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. पुणे फेस्टिव्हलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच भाजप नेत्यांच्या हस्ते आणि उपस्थितीत फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचवल्या आहेत.
एकेकाळी पुण्याचे एकहाती नेतृत्व करणाऱ्या तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हल सुरू केला.
तेंव्हापासून पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन कायम काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्तेच झाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात कलमाडी यांचे नाव आल्यानंतर त्यांना शिक्षा झाली आणि काँग्रेसनेही त्यांना दूर केले होते. यंदा मात्र पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला भाजप नेत्यांना कलमाडी यांनी निमंत्रित केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पुणे फेस्टिव्हल आयोजनाच्या दृष्टीने सुरेश कलमाडी काही दिवसांपूर्वी महापालिकेत दाखल झाले होते. तेंव्हापासून ते शहराच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फेस्टिव्हलसाठी निमंत्रित करून कलमाडी भाजपबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीही कलमाडी भाजपमध्ये प्रवेश करतील, असे बोलले जात होते. भारतीय जनता पक्षाकडून कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. मात्र आता कलमाडी यांच्याच कार्यक्रमाला भाजप नेते उपस्थित राहणार असल्याने त्याबाबतही तर्क-वितर्क लढविले जात आहेत.