एटीएममधून पैसे काढणे महाग
व्हाईट लेबल एटीएम चालकांकडून एटीएम शुल्क वाढवण्याची मागणी

पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी झटका देणारी बातमी आहे. आता एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. एटीएममधून पैसे काढणे तुमच्या खिशाला कात्री लावणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज फी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. वाढीव शुल्क 1 मे 2025 पासून लागू होणार आहे.
होम नेटवर्क बाहेर ATM शुल्क वाढणार
रिपोर्टनुसार, 1 मे पासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. होम बँक नेटवर्क बाहेर एका मर्यादेपलीकडे एटीएम मशीनमधून पैसे काढल्यावर किंवा बॅलेंस चेक केल्यावर पैसे लागत होते. आता त्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. युजरला जास्त चार्ज द्यावा लागणार आहे. ही वाढ येत्या एक मे पासून होणार आहे. त्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) प्रस्तावात संशोधन करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे.
किती वाढले शुल्क
ग्राहकास आतापर्यंत त्यांचे खाते असलेल्या बँकेच्या एटीएमऐवजी इतर कोणत्याही नेटवर्क बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यावर प्रत्येक व्यवहारावर 17 रुपये शुल्क द्यावे लागत होते. ते आता 1 मे पासून वाढून 19 रुपये करण्यात आले आहे. तसेच इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी सहा रुपये शुल्क लागत होते. ते आता सात रुपये करण्यात आले आहे. हे शुल्क मोफत मासिक ट्रॉन्जेक्शनची मर्यादा संपल्यावर आहे. मेट्रो शहरात होम बँकेशिवाय इतर ठिकाणावरुन रक्कम काढण्यासाठी पाच ट्रॉन्जेक्शन दिले आहे. त्यापेक्षा जास्त झाल्यावर शुल्क लागते. नॉन मेट्रो शहरांसाठी ही मर्यादा तीन आहे.
व्हाईट लेबल एटीएम चालकांकडून एटीएम शुल्क वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. वाढत्या खर्चाचा विचार करून जुनी फी कमी असल्याचा त्यांचा दावा होता. आता एनपीसीआयच्या प्रस्तावाला आरबीआयने मंजुरी दिल्यानंतर छोट्या बँकांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.