देशाच्या परिवर्तनाचे राजदूत म्हणून काम करण्याची भूमिका कायम ठेवण्याचे लष्करप्रमुखांचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/पुणे-52-780x470.jpg)
पुणेः लष्करातर्फे नवव्या माजी सैनिक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी सैनिकांना राष्ट्रनिर्मितीसाठी विविध क्षेत्रांमध्ये सहभागी करून घेणे शक्य असल्याचे मत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. तसेच या संदर्भात स्वतः सैन्यात काम केलेल्या काही राज्यपालांनी या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. माजी सैनिकांनी बदलाचे आधारस्तंभ आणि देशाच्या परिवर्तनाचे राजदूत म्हणून काम करण्याची भूमिका कायम ठेवण्याचे आवाहन देखील लष्करप्रमुखांनी यावेळी बोलताना केले.
भारतीय सैन्य राज्य सरकारांसमवेत काम करत आहे. यामध्ये माजी सैनिकांचा समावेश केल्याने राज्याच्या कामाला फायदा होईल. तसेच एकप्रकारचे नाते तयार होईल, त्यातून माजी सैनिक आणि राज्य सरकार दोघांचाही फायदा होऊ शकतो, असे ते म्हणाले. अशाच पद्धतीने जिल्हास्तरावरही काम करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याणकारी योजनांद्वारे १२ हजार लाभार्थ्यांना ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अनेकांना आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला. माजी सैनिकांच्या रोजगारासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा’; शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आर्मी डे दरवर्षी १५ जानेवारीला साजरा करण्यात येतो. लेफ्टनंट जनरल के. एम करियप्पा यांनी १९४९ या दिवशी पहिल्यांदा भारतीय सेना प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली होती. आर्मी डे चा प्रमुख उद्देश भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. यामध्ये परेड, आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन असते. तसेच सैन्याच्या विविध टुकड्यांचा मार्च देखील काढण्यात येतो.
दिल्लीतील करियप्पा ग्राउंडवर आर्मी डेच्या दिवशी झालेली परेड आता विविध शहरांमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २०२३ मध्ये बंगळुरुमध्ये २०२४ मध्ये लखनौमध्ये परेड आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुण्यात परेड आयोजित करण्यात आली आहे.