आंद्रा धरण भरले; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ होणार

पुणे : वडगाव मावळ येथील आंद्रा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून इंद्रायणी नदीत पाणी सोडले जात असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.
आंद्रा धरणाची क्षमता 82.75 टीएमसी आहे. मागील काही दिवसांपासून मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण गुरुवारी (दि. 1) 100 टक्के क्षमतेने भरले आहे. हे धरण द्वारविरहित आहे. त्यामुळे धरण भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग केला जातो.
हेही वाचा – पूजा खेडकर यांचे लैंगिक छळाचे आरोप; जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले..
सध्या धरण भरले असल्याने सांडव्यावरून 210 क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाऊस आणि धरणातील पाण्याचा येवा वाढत गेल्यास यामध्ये वाढ होणार आहे. आंद्रा धरणाचा विसर्ग इंद्रायणी नदीत मिसळतो. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.
परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.