पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट ओळखपत्राचे वाटप
पुणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात पाचशे ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर उपलब्धतेनुसार ओळखपत्रांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, बंद असलेली बायोमॅट्रिक्स यंत्रणाही महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी मात्र करोना संसर्ग कालावधीत बंद असलेली बायोमॅट्रिक्स हजेरी महापालिका प्रशासनाकडून पुन्हा सुरू करण्यात आली. महापालिकेतील सेवकांसाठी प्रशासनाने बायोमेट्रीक हजेरी आधारशी जोडली आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर किती वाजता आला आणि कामाचे तास पूर्ण झाले की नाही, याची माहिती प्रशासनाला मिळत आहे. करोना संसर्ग काळात ही संगणकीय प्रणाली बंद ठेवण्यात आली होती. करोना संसर्ग नियंत्रणात आल्याने महापालिकेचे कामकाजही पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून कर्मचाऱ्यांची उपस्थितीही शंभर टक्के आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक्स पद्धतीने उपस्थितीची नोंद करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढले होते.
मात्र त्याला कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद देण्यात आला नव्हता. त्यामुळे आता बायोमॅट्रिक्स पद्धतीने हजेरी न लावल्यास वेतन दिले जाणार नाही, असे बिनवडे यांनी आदेश काढले होते. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्मार्ट ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्या ओळखपत्रामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. कर्मचाऱ्यांना आधार नंबर टाकण्याची आवश्यकता भासणार नाही.