सर्व पुलांची तज्ज्ञांकडून पाहणी; हजारभर पुलांच्या तपासणीसाठी सव्वा कोटींचा खर्च होणार

पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शहरातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे ठरवले आहे. पालिकेच्या स्थायी समितीने तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने शहरातील १०३४ लहान- मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही माहिती प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजरे यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार, शहरातील सर्व पूल, उड्डाणपूल, रेल्वे पूल, फुटओव्हर ब्रिज, भुयारी मार्ग, कल्व्हर्ट आदींचे स्ट्रक्चरल ऑडीट बंधनकारक आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून स्ट्रक्टॉनिक कन्सल्टिंग इंजिनीअर्स या संस्थेची निवड केली आहे. या कामासाठी १ कोटी १८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी ठरवला आहे.
हेही वाचा – ‘हा पवित्र क्षण प्रत्येकासाठी फलदायी ठरो’; आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा….
पहिल्या वर्षात सर्व पूल आणि कल्व्हर्टची सविस्तर पाहणी करून अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर दरवर्षी अपडेटेड अहवाल दिला जाणार आहे. तीन महिन्यांच्या अंतराने पुलांची तपासणी करण्यात येईल. महत्त्वाच्या पुलांची पाहणी प्राधान्याने केली जाईल. पावसाचे बदलते स्वरूप, वाढलेले जलप्रवाह आणि शहरीकरणामुळे पुलांवरील वाढलेला ताण, अशा परिस्थितीतील धोके ओळखून वेळेत दुरुस्ती केल्यास अपघात रोखता येऊ शकतील.
पालिकेच्या भवन विभागाने यापूर्वी ९८ मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. त्यापैकी ३८ पूल तांत्रिकदृष्ट्या धोकादायक स्थितीत आढळले. त्यापैकी ११ पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २७ पुलांसाठी २७ कोटी रुपयांची गरज असून, यावर्षी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरात ९८ मोठे पूल, वाहतुकीचे प्रमुख पूल २३६ तर लहान पूल व कल्व्हर्ट ७०० आहेत. या सर्वांची तपासणी होणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“संपूर्ण तपासणी, अहवाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे पुलांच्या सुरक्षेचा दर्जा वाढेल. ही प्रक्रिया नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.”
– दिनकर गोजरे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, पुणे महापालिका