अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; सात महिन्यात १० हजार नागरिकांवर कारवाई
![Action plan against polluters; Action against 10 thousand citizens in seven months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-08T114647.786-780x470.jpg)
शहर अस्वच्छ करणाऱ्या दहा हजार ९१ नागरिकांवर गेल्या सात महिन्यांत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि राडारोडा टाकणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थान विभागाकडून देण्यात आली. या नागरिकांकडून ४६ लाख ५४ हजारांचा दंडही प्रशासनाकडून वसूल करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेकडून लोकसहभाग वाढविण्याबरोबरच दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते झाडणे, कचरा उचलण्यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याने कारवाईचा वेगही वाढविण्यात आला आहे. राडारोडा घेऊन जाण्यासाठी नि:शुल्क दूरध्वनी सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र त्यानंतरही रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे रात्री अपरात्री राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सार्वाजनिक ठिकाणी टाकला जाणार कचरा, थुंकणे, घाण करणे यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत.