राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी बांगलादेशींवर कारवाई करा; विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा आंदोलनाचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-16-780x470.jpg)
नारायणगाव : राजकीय भेदभाव न ठेवता राष्ट्र सुरक्षितता व राष्ट्रहितासाठी घुसखोरी करून नारायणगाव येथे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करावी. १४ दिवसांत सखोल चौकशी करून पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत लेखी अहवाल देण्यात यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भीमाशंकर जिल्हा पुणे ग्रामीण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऋषिकेश वायकर, अमोल रावत, आदित्य हांडे, पवन हांडे, नामदेव खैरे, अक्षय खोकराळे, जमीर शेख, निलेश डुंबरे, रुपेश खैरे, विवेक कहडणे, गौतम औटी, स्वप्निल काकडे आदींनी नारायणगाव पोलीसांना निवेदन दिले असून निवेदनाची प्रत जुन्नर तहसीलदार व पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात येणार आहे.
हेही वाचा – शहरातील कोणत्याही भागातून मिळणार विमानतळासाठी मेट्रोची कनेक्टिव्हीटी
नाशिक शहरातील आडगाव परिसरातून अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांवर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. तपास करून गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. आहे. आठ बांगलादेशींपैकी तीन बांगलादेशीं नागरिकांकडे नारायणगाव येथील आधार कार्ड पोलिसांना मिळून आले आहे. नाशिक पोलिसांनी तात्काळ आरोपींना नारायणगाव येथे आणून पुढील चौकशी सुरू केली आहे.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव कृषी क्षेत्रातील जागतिक दर्जाची बाजारपेठ असून खोडद येथे आशिया खंडातील विज्ञान संशोधनातला जीएमआरटी सारखा प्रकल्प कार्यरत आहे. नारायणगाव शहरात अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांमुळे भविष्यात सामाजिक सुरक्षितता व शांततेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे. घरोघरी जाऊन मतदार यादीतील नोंदणी प्रमाणे बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्यावर तसेच त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.