अमली पदार्थ विक्रीची तक्रार दिल्याने महिलेच्या घरात तोडफोड
![Many people were cheated of lakhs of rupees under the guise of friendship](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/crime-1.jpg)
पुणे : मुंबई-पुणे रस्त्यावरील इराणी वस्ती परिसरात अमली पदार्थ विक्री सुरू असल्याची तक्रार देणाऱ्या महिलेच्या घरात शिरुन टोळक्याने तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शब्बीर कंबर इराणी, जमीर कंबर इराणी, नादर चंगेज इराणी, फिदा मालू इराणी, जावेद मालू इराणी, जैनत कंबर इराणी, सीता सलीम शेख ( सर्व रा. इराणी वस्ती, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रुक्साना सय्यदनूर इराणी (वय ५०, रा. इराणी वस्ती, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रुक्साना यांनी आरोपींच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. इराणी वस्तीत चरस, गांजा विक्री सुरू असून अमली पदार्थ विक्री बंद करण्याची मागणी त्यांनी तक्रार अर्जाद्वारे केली होती. रुक्साना आणि कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले होते. त्यावरून आरोपी हे रुक्साना यांच्या घरात शिरले. पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. रुक्साना यांच्या घरातील गृहापयोगी साहित्याची तोडफोड करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करत आहेत.