रेल्वे स्थानकावर मास्क न वापरणा-यांकडून साडेसहा लाखांचा दंड वसूल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/pune-railway-station-1.jpg)
पुणे l प्रतिनिधी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर मास्क न वापरणा-या प्रवासी, नागरिकांवर रेल्वे प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणा-यांकडून प्रत्येकी 200 ते 250 रुपये दंड वसूल केला जात आहे. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत पुणे रेल्वे विभागात मास्क न वापरणा-या प्रवाशांकडून साडेसहा लाखांचा दंड वसून करण्यात आला आहे.
पुणे रेल्वे विभागात रेल्वे स्थानकांवर मास्क न वापरणा-या 102 नागरिकांवर डिसेंबर महिन्यात कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत दोन हजार 729 प्रवाशांकडून सहा लाख 48 हजार 650 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकांवर मास्क वापरत नसलेल्या प्रवाशांकडून दंड घेला जातो. प्रवाशांना त्याबदल्यात दंडाची पावती आणि मास्क दिला जातो. या कारवाईमधून मास्क वापरण्याबाबत जनजागृती देखील केली जात आहे. कोरोना महामारीला संपवण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्थानक, परिसरात, रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे आवश्यक आहे. रेल्वेमध्ये थुंकून घाण करू नये. कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.