श्वानाने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला ५०० रुपये दंड
![A fine of Rs 500 will be imposed on the owner if the dog fouls in public](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-15T090531.882-780x470.jpg)
पुणे : पाळीव श्वानाने सार्वजनिक रस्ते, पदपथांवर घाण केल्यास श्वान मालकाला पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून दंडात्मक कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. कोथरूड परिसरात एका श्वान मालकाला पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थान विभागाकडून देण्यात आली.
शहरात मोठ्या प्रमाणावर श्वानप्रेमींकडून श्वान पाळले जात आहेत. शहरात ऐंशी हजार पाळीव श्वान असल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. यापैकी केवळ साडेपाच हजार श्वानप्रेमींनी श्वान पाळण्याचा परवाना घेतला आहे. त्यामुळे श्वानाची नोंदणी आणि परवाना घेणे महापालिकेने बंधनकारक केले आहे.
श्वानप्रेमींकडून सकाळी आणि संध्याकाळी सार्वजनिक ठिकाणी श्वान आणले जातात. सार्वजनिक रस्ते, पदपथ, उद्यानात श्वानांकडून घाण करण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आणि क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने करण्यात येत आहेत. त्यावरून श्वान मालक आणि नागरिकांचे वादावादीचे प्रकारही होत आहेत. महापालिका श्वान मालकांवर दंडात्मक कारवाई करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असल्याने आता दंडात्मक कारवाईला गती देण्यास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामुळे श्वानांकडून सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास त्याच्या मालकाकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश शहरातील सर्व पंधरा क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. तसेच त्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.