Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी

मुंबई : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबामंदीर देवस्थान परिसराचा रोपवे व अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे विकास करण्यात येणार असून तेथील आध्यात्मिक, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यासाठी  परिसरातली सुमारे शंभर कोटी रुपये किमतीची 24 एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परीषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. राज्यातील आणि राज्याबाहेर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निमगाव खंडोबा देवस्थानाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. निमगाव – खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे- नासिक मार्गावरील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर पासून 6 किमी अंतरावर आहे.

राज्याच्या महसूल व वन विभागाने आज 8 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मौजे निमगाव येथील गट क्रमांक 135 मधील 14 हे. 40 आर. गायरान आणि शासकीय जमीन रोपवे व सार्वजनिक सुविधांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे मोफत वर्ग करण्यात आली आहे. जमिनीचा ताबा घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर सुरू करणे तसेच या भागात वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. निमगाव खंडोबा देवस्थान प्राचीन, ऐतिहासिक महत्वाचे आध्यात्मिक स्थान असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

हेही वाचा –     Political Battle : “लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दिसला”; जम्मूच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आणि प्रयत्नशील होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मौजे निमगाव येथील 24 एकर शासकीय गायरान जमिन निमगाव खंडोबा मंदीर देवस्थान परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी आला. हा निर्णय जाहीर झाल्याने राज्यातील तसेच राज्याबाहेरील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या निर्णयामुळे मौजे निमगाव खंडोबा देवस्थान परिसराच्या विकासाला लवकरच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव , निमगाव हे ग्राम नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्यासाठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे, जुन्याकाळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते, त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव – नागना असा होत असे, काळाचे ओघात नागना गाव उध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसऱ्या गावावरून हे गाव निमगाव – दावडी या नावाने प्रसिद्ध झाले, आत्ता हे गाव निमगाव – खंडोबा या नावाने रूढ होत आहे. पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते. त्यामुळे या गावास ऐतिहासिक महत्वही होते. हे गाव भीमा नदी काठी वसलेले आहे, तेथील भग्न अवस्थेतील घाट, वाडे आपल्या पूर्व वैभवाची हे साक्ष देत आहेत. निमगाव – खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे- नासिक मार्गावरील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर पासून 6 किमी अंतरावर आहे. निमगावचे उत्तरेस 1.5 किमी अंतरावरील टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे. येथे थेट गाडी मार्ग मंदिराजवळ जातो. पायरी मार्गानेही येथे पोहचता येते. कोटाचे दक्षिण बाजूने सुमारे 100 पायरी चढून कोटा पर्यंत जाता येते. पायरी मार्गाचे सुरवातीस एक पूर्वाभिमुख भैरवनाथाचे मंदिर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button