२० टक्के नागरिकांना सपाट पायामुळे वेदना ; आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
पुणे : कौटुंबीक इतिहास, लठ्ठपणा, मधुमेह आणि वृद्धापकाळ अशा विविध कारणांमुळे प्रौढ आणि लहान मुलांमध्ये सपाट पायांची समस्या दिसून येते. अशा व्यक्तींना चालताना आणि दीर्घकाळ उभे राहताना वेदना होतात, तसेच पायांच्या आतील बाजूला सूज येते. सांधेदुखी, संधीवात, पाठ दुखणे अशा तक्रारी टाळण्यासाठी सपाट पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
सपाट पाय लवचिक असतात किंवा कडक असतात. कुटुंबातील कोणाला सपाट पायाचा त्रास असेल, तर मुलांनाही तो आनुवांशिक असू शकतो. प्रौढांमध्ये हाडांची झीज झाल्याने सपाट पायाचा त्रास सुरू होऊ शकतो. लठ्ठपणा, मधुमेह आणि दुखापत या कारणांमुळेही त्रास होण्याची शक्यता असते. सपाट पायामुळे घोटय़ावर आणि गुडघ्यांवर सतत ताण पडतो.
लोकमान्य रुग्णालयाचे शल्यविशारद डॉ. श्याम ठक्कर म्हणाले, सपाट पाय असलेल्या लोकांचे तळवे जमिनीला स्पर्श करतात. मुले चालू लागतात तेव्हा त्यांचे तळपाय सपाट दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
एकूण लोकसंख्येपैकी १० ते २० टक्के लोकांचे पाय सपाट असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यातून पायाच्या दुखण्यातील गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते.
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे डॉ. विश्वजित चव्हाण म्हणाले, थकवा, चालताना पाय दुखणे ही सपाट पायाची लक्षणे आहेत. पायाचे तळवे, गुडघा, खुबा आणि पाठीच्या खालच्या भागात आणि पायांच्या खालच्या भागात वेदना होतात. तसेच सांध्यांची झीज, संधीवात हे त्रास लवकर होण्याचा धोका असतो. गुळगुळीत पृष्ठभागावर पाय ठेवल्यानंतर तळवा जमिनीला स्पर्श करत असल्यास सपाट पायाचे निदान व्यक्ती स्वत:ही करू शकतात.
यामुळे उद्भवणाऱ्या दुखण्याकडे मात्र दुर्लक्ष न करणे आणि वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
काय काळजी घ्याल?
* वजन नियंत्रणात ठेवा
* व्यायाम, ‘स्ट्रेचिंग’ करा, आणि आरामदायी बूट वापरा
* डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घ्या
* संतुलित आहार आणि आवश्यकतेप्रमाणे पथ्य पाळा