पुण्यासह राज्यातील नेत्यांनी भरला १७ कोटींचा मिळकतकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/शंकर-जगताप-3-780x470.jpg)
पुणे : मिळकतकर भरण्याकडे दुर्लक्ष करत पैसे थकवणाऱ्या तसेच थकबाकी वसुलीस गेल्यास राजकीय दबावाचा वापर करणाऱ्या नेत्यांनी महापालिकेने मागणी न करताही सुमारे १७ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा केला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या आणि उमेदवारी निश्चित असलेल्या इच्छुकांकडून हा कर भरण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपाच्या वसुली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सुस्कारा सोडला आहे.
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना सुमारे ३५ प्रकारचे ना-हरकत प्रमाणपत्रे ( एनओसी) अर्जासोबत द्याव्या लागतात. त्यात मिळकतकर, पाणीपुरवठा, महावितरण अशा शासकीय कार्यालयांच्या “एनओसी’चा समावेश असतो. पुण्यात अनेक राजकीय नेत्यांच्या व्यावसायिक तसेच निवासी मिळकती आहेत.
हेही वाचा – निवडणूक निरीक्षकांची माध्यम कक्षाला भेट
तर, इच्छुक उमेदवारांच्याही मिळकती असतात. त्यामुळे पालिकेचा कर भरल्याशिवाय या “एनओसी’ मिळत नाहीत. या साठी पालिकेचा कर भरणे अत्यावश्यक आहे. एरवी चार ते पाच वर्षे कर थकविणारे हे उमेदवार निवडणुकीसाठी मात्र न मागताच कर भरत असल्याचे समोर आले आहे.
या थकबाकी वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक नेत्यांकडून दबाव टाकला जातो. तसेच मिळकतकर भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच कर भरण्यासाठी महापालिकेने नोटीस काढल्यास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला जातो. राज्यातील काही बड्या नेत्यांची एक ते दोन कोटींची; तर काहींची चार ते पाच कोटींची थकबाकी होती. त्याबाबत महापालिकेने नोटीस काढल्यास अधिकाऱ्यांना धमकावल्याचे प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आले होते.