शहराच्या विविध भागात १ हजार ७०० चार्जिंग पाॅईंट
![1 thousand 700 charging points in various parts of the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/43f519fd-ab38-487c-a51a-c61fe3b40e2b-780x470.jpg)
पुणे : ई-वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे चार्जिंक स्थानके उभारण्यास महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागात १ हजार ७०० चार्जिंग पाॅईंट महापालिकेने प्रस्तावित केले आहेत. महापालिकेच्या इमारती, नाट्यगृह, वाहनतळ, उद्याने अशी ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यातून एकाच वेळेस ३०० ई-मोटारींसाठी चार्जिंग उपलब्ध होणार आहे.
प्रादेशक परिवहन विभागाकडील आकडेवारीनुसार शहरात २९ हजार ई-वाहनांची नोंद आहे. त्यामध्येही चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. ई-वाहनांच्या तुलनेत शहरात मर्यादित स्वरूपात चार्जिंग पाॅईंट आहेत. त्यामुळे आता ते वाढविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शाळा, वाहनतळ, उद्याने आणि रुग्णालये अशा महापालिकेच्या मिळकतींमध्ये चार्जिंग पाॅईंट उभारण्याचे नियोजित आहे. याशिवाय महापालिकेने भाडेतत्त्वावर ई-बाईक योजनेला मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत विविध भागात २५० चार्जिंग पाॅईंट उभारण्यात येणार आहेत. सध्या विद्युत विभागाने ५०० ठिकाणे दिली आहेत.प्रत्येक ठिकाणी दुचाकीसाठी दोन चार्जिंग पॉइंट आणि चारचाकी वाहनांसाठी एक असेल. त्यामध्ये एक पाॅईंट वेगाने चार्जिंग करणारा तर दुसरा पाॅइंट कमी वेगाने चार्जिंग होणारा असेल.
जलदगतीला सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी लागणार असून कमी वेगाने चार्जिंग होण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्यासाठी महापालिका खासगी कंपन्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीकडून चार्जिंगसाठीचे शुल्क आकारले जाईल. खासगी वाहनांसाठी शहराच्या सर्व भागात चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या इमारती, नाट्यगृह, वाहनतळ, उद्याने अशा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.