#Coronolockdown:लॉकडाऊनदरम्यान पुण्यात, 82 हजार जणांवर कारवाई, 33 हजार वाहनं जप्त
पुणे : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांनी 1200 जणांचा टप्पा ओलांडला आहे. तर मृतांच्या आकड्यांनी शतक ओलांडला आहे. कोरोनाचा विळखा वाढण्यामागे पुणेकरही तितकेच कारणीभूत आहे. लॉकडाऊनदरम्यान पुणे पोलिसांनी तब्बल 82 हजार 631 कारवाई केल्या आहेत. गेल्या महिन्याभरातील या कारवाईवरुन यावरुन पुणेकरांना बेशिस्तपणा समोर येत आहे.
पुण्यात कलम 188 अंतर्गत तब्बल 13 हजार 050 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 33 हजार 361 वाहने जप्त केले आहेत. त्याचबरोबर 34 हजार 743 नोटीसा बजावल्या आहेत. तर मॉर्निंग वॉक करणाऱ्या 778 आणि मास्क न वापरणाऱ्या 699 नागरिकांवर कारवाई केली. ही कारवाई अजूनही सुरु असून याचा आकडा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात आता 1646 एसपीओ नियुक्त करण्यात आले आहेत.
पुण्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. मात्र काही पुणेकर किरकोळ कारणास्तव नियमांचा भंग करून मोकाट फिरताना दिसतात. त्यामुळे प्रशासन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतेय. मात्र अशा मोकाट फिरणाऱ्यामुळे त्यामध्ये बाधा येत आहे.