स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू पुण्यात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/flu-Frame-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूमुळे तब्बल २४४ जणांनी जीव गमावला आहे, तर पुण्यात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक म्हणजे ५६ मृत्यू झाले आहेत. ३१ लाख ८३ हजार ५०२ रुग्ण हे स्वाइन फ्लूसदृश असल्याची नोंद आहे, तर बाधित रुग्णांची संख्या राज्यात २,२८९ इतकी आहे. पुण्यानंतर नागूपरमध्ये ४०, कोल्हापूरमध्ये २२, मुंबईत ५ आणि नाशिकमध्ये ३९ रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेला आहे. देशातही स्वाइनच्या बळींमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी असून, त्यानंतर राजस्थानमध्ये २०८ रुग्णांचा बळी गेलेला आहे.
राजस्थानमधील रुग्णांची संख्या पाच हजारांच्या घरात आहे. पावसाळ्यानंतर वातावरणातील थंडावा वाढल्यामुळे या आजाराच्या विषाणूंचा संसर्ग अधिक वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागाचे डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. यात स्थलांतरित रुग्णांचाही समावेश आहे. राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्ल्यूएंझा लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, २०१८ साली राज्यात ४६२ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू ओढावला होता. मात्र, त्याचे प्रमाण यंदाच्या वर्षात कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केलेले आहे.