सांगलीतील प्रवाशाकडे 23 हजार रुपयांच्या बनावट नोटा
- एकाला अटक : बॅग बदली झाल्याने उघड झाला प्रकार
पुणे- एस.टी. प्रवाशाकडे 500 रुपयांच्या 46 बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 21 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. बॅग बदली झाल्याने हा सारा प्रकार उघड झाला आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी फिर्याद दिली असून, अविनाश संभाजी चव्हाण ( रा. मु.पो.डोंगरसोनी, तासगाव, जि.सांगली) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी चव्हाण याचा साथीदार फरार झाला आहे. आरोपी अविनाश चव्हाण हा एस.टी.बसने सांगलीहून राजगुरूनगरकडे जात होता. त्यावेळी त्याने आपली बॅग बसच्या रॅकमध्ये ठेवली होती. मात्र, त्याच्या बॅगची अदला-बदल झाली. अन्य एका प्रवाशाने चव्हाणची बॅग आपली असल्याचे समजून ती उचलत तो स्वारगेट स्थानकावर उतरला.
त्याने बॅग उघडली असता, ती आपली नसल्याचे त्याच्या लक्षात आले. मात्र, तेवढ्या वेळात बस स्वारगेट स्थानकातून निघून गेली होती. ही बॅग संबंधित प्रवाशाला परत करावी, यासाठी काही ओळखपत्र शोधण्यसाठी बॅग उघडली. त्यावेळी बॅगेत 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. त्या बनावट असल्याने त्या प्रवाशाने सहकारनगर पोलिसांशी संपर्क साधून बॅग पोलिसांकडे सुपुर्द केली.त्यानंतर पोलिसांनी आरोपी चव्हाण याच्याशी संपर्क साधून बॅग घेण्यासाठी बोलावले व अटक केली. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. बडे तपास करत आहेत.