विद्यार्थ्यांनो, अकरावीचे अर्ज आजपासून भरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/admission-online-11.jpg)
पुणे – यंदाच्या वर्षीच्या अकरावी प्रवेशाचे बिगुल वाजले असून अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या भाग-1 साठी प्रवेश लिंक आज दि. 10 रोजी सकाळ 11 वाजल्यापासून खुली होणार आहे. विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिकेच्या आधारे युजर आयडी व पासवर्डचा वापर करून ऑनलाइन माहिती भरावी, असे आवाहन अकरावी प्रवेश समितीने केले आहे.
चालू शैक्षणिक वर्षासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे ऑनलाइन प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून ही लिंक खुली होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील महाराष्ट्र बोर्डाच्या माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून ते प्रुव्ह करावेत, तसेच दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना प्रवेश समितीने शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
तसेच मनपा हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांना अर्ज (भाग 1 व 2) हे दहावीच्या निकाल घोषित झाल्यानंतर पुढील दहा दिवसांत भरून घ्यावेत, असेही समितीने कळविले आहेत. इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्जही दहावीचा निकाल घोषित झाल्यानंतर भरायचे आहेत. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यानी महितीपुस्तिकेत दिलेल्या मार्गदर्शन केंद्रावरून अर्ज प्रुव्ह करावेत, असे समितीने कळविले आहे.