विजयस्तंभाच्या पारंपरिक कार्यक्रमाला विरोध केल्याचा आरोप बिनबुडाचा – डॉ. सिद्धार्थ धेंडे
![Binbuda accused of opposing the traditional program of Vijayasthambha - Dr. Siddharth Dhende](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/धेंडे.jpg)
कोरोनाचे गांभीर्य ओळखून कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी गर्दी न करण्याचे रिपाईचे आवाहन
पुणे | प्रतिनिधी
कोरोनाचे गांभीर्य ओळखून आंबेडकरी संघटनांनी व अनुयायांनी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे जाऊन गर्दी करू नये. शासनाने विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम करावा. आम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्था, संघटनेला विरोध केलेला नाही. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन यंदा कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ परिसरात सार्वजनिक कार्यक्रम होऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे. मात्र काही लोकांनी आमचा विजयस्तंभ मानवंदना पारंपरिक कार्यक्रमाला विरोध असल्याचा भ्रम निर्माण केला आहे. या बाबतीत कोणीही राजकारण करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी उपमहापौर नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केले.
‘रिपाइं’ नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनावणे आदीसह भाई विवेक चव्हाण, राहुल डंबाळे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. अजूनही कोरोनाचे सावट आहे. या काळात पंढरीची वारी, गणेशोत्सव, ईद, गुड फ्रायडे, दिवाळी, दसरा अशा कोणत्याही धर्माचे सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या, विविध महत्वाचे दिवस साजरे झालेले नाहीत. सर्व धर्मियांनी, राजकीय पक्षांनी सार्वजनिक कार्यक्रमाच्या मर्यादा पाळल्या आहेत. मग आपण त्याला अपवाद का ठरावे? विजयस्तंभ मानवंदना सार्वजनिक स्वरूपात होण्याचा अट्टाहास कशासाठी? याचा आपण विचार केला पाहिजे. आंबेडकरी समाज शिस्तप्रिय आणि समजूतदार आहे, हे आपण दाखवून द्यावे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी लाखो नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा किंवा साथ प्रतिबंध कायदा मोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
परशुराम वाडेकर म्हणाले, गेल्या ४५ वर्षांपासून ‘रिपाइं’सह अन्य जुन्या संघटनांना विजयस्तंभ परिसरात जाहीर कार्यक्रम घेण्याची परंपरा आहे. मात्र आम्ही सर्व यंदा कोरोनामुळे नागरिकांचे हित लक्षात घेता कोणतेही कार्यक्रम घेण्याचे टाळले आहे. काही लोक चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करत असून, समाजबांधवात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाप्रमाणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमही प्रशासनाने करावा. इतर कोणत्याही संघटनांना हस्तक्षेप करू देऊ नये. आपली दुकानदारी मांडण्याचा काहीजण प्रयत्न करताहेत. त्यांना आळा घालावा, अशी मागणी या वेळी त्यांनी केली.