“वायसीएम’च्या चार डॉक्टरांचे राजीनामे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/YCMH.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच) रुग्णालयातील चार डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. उपअधिक्षक डॉ. शंकर जाधव यांनी विनाकारण झापल्याचा आरोप करत या डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.
वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याकडे बुधवारी (दि. 6) डॉ. अपुर्वा होलानी, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. अभिजित जवकर आणि डॉ. योगेश गाडेकर यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. हे सर्व डॉक्टर तज्ज्ञ असून यांना पालिकेने त्यांना एका वर्षासाठी मानधनावर घेतले आहे. हे सर्व स्त्री रोग विभागात कार्यरत आहेत.
याबाबतची माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी वायसीएमएच मधील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. रुग्णावर उपचार करताना त्रुटी राहिले असल्याचे सांगत उपअधिक्षक डॉ. शंकर जाधव यांनी या सर्व डॉक्टरांना कार्यालयात बोलावून घेत, त्यांना फैलावर घेतले. ही आमची जबाबदारी नसल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. तरी देखील जाधव यांनी या डॉक्टरांना खडेबोल सुनावले. त्यामुळे या चारही डॉक्टरांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याकडे राजीनामे सोपविले आहेत.
मनोज देशमुख म्हणाले, या चार डॉक्टरांचे लेखी राजीनामे माझ्याकडे आले आहेत. वरिष्ठांशी चर्चा करुन मंजूर करायचे की नाही. याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तर वायसीएमएचे प्रमुख डॉ. पवन साळवे म्हणाले, रुग्णावर उपचार करत असताना काही त्रुटी राहता कामा नयेत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. कोणत्या त्रुटी राहिल्या होत्या. याची माहिती घेतली जाईल. वरिष्ठांनी देखील डॉक्टरांना सूचना देताना दक्षता घेतली पाहिजे. या चारही डॉक्टरांनी मनोज देशमुख यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. राजीनामे मंजूर करु नका, अशी सूचना त्यांना केली आहे. चारही डॉक्टरांना समोरा-समोर बोलावून घेऊन प्रश्न सोडविण्यात येईल.