लोहगावच्या नव्या टर्मिनलचे काम नोव्हेंबरपासून
![Lohgaon Airport closed till October 29 for runway repairs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/pune-airportrr1.jpg)
लोहगाव विमानतळाच्या प्रस्तावित विस्तारीकरणासाठी पर्यावरण विभागाकडून घेण्यात आलेल्या हरकती-सूचनांवर सार्वजनिक सुनावणी पार पडली आहे. त्यानुसार येत्या एक महिन्यात पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर नोव्हेंबरपासून विमानतळाच्या नवीन टर्मिनल उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाची नितांत गरज आहे. त्यासाठी लष्कराकडून पंधरा एकर जागा घेण्यात आली आहे. मात्र, विस्तारीकरणाच्या कामाआधी पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे. पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. या पाश्र्वभूमीवर भारतीय विमानतळ प्रशासन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया- एएआय) पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रस्ताव दाखल केला आहे.
नियोजित विस्तारीकरण प्रकल्पामुळे रहिवासी, पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्था, कामामुळे प्रभावित होणारे रहिवासी यांना प्रकल्पाबाबत आक्षेप, सूचना, टिप्पणी तोंडी किंवा लेखी स्वरूपात नोंदवता यावी यासाठी एक महिन्याची मुदत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली होती. विहित मुदत संपल्यानंतर बुधवारी लोहगाव विमानतळ येथे पर्यावरणविषयक सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीला विविध संस्था, संघटना आणि नागरिक असे मिळून शंभर जण उपस्थित होते. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालय, विमानतळ प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या सुनावणीमध्ये नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे विमानतळ प्रशासनाने निरसन केले. त्यामुळे पर्यावरण विभागाचे ना हरकत मिळण्यास अडचण येणार नाही, असे विमानतळ संचालक अजयकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विमानतळाच्या परिसरात हवा शुद्ध करण्यासाठी यापूर्वी चार हवा शुद्ध करणारी यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. येत्या डिसेंबपर्यंत या यंत्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच, पर्यावरणाच्या रक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही विमानतळ प्रशासनातर्फे सुनावणीच्या वेळी उपस्थितांना सांगण्यात आले.
चौकट विस्तारीकरणाचा आराखडा तयार
गेल्या अनेक वर्षांपासून लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण रखडले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी १५.८४ एकर जागा विस्तारीकरणासाठी देण्याची घोषणा मे २०१६ मध्ये केली होती. १५ मार्च २०१८ रोजी ही जागा विमानतळ प्राधिकरणाला कागदोपत्री हस्तांतरित करण्यात आली. सध्याच्या विमानतळ आवारात एका वेळी पाच विमानांच्या तळासह टर्मिनल इमारत, प्रतीक्षालय, उपाहारगृह आहे. प्रस्तावित विस्तारीकरणात नवीन टर्मिनलची इमारत, जुन्या टर्मिनलचे नूतनीकरण, ‘अॅप्रन आणि टॅक्सी वे’, बहुमजली वाहनतळ, कार्गो टर्मिनल आदी सुविधांचा समावेश आहे. त्यानुसार आराखडा देखील तयार करण्यात आला आहे.