लोणावळा-खंडाळ्यात धुके आणि ऊन-पावसाचा लपंडाव
लोणावळा आणि खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण असून सध्या पर्यटक हे धुक्याचा आनंद घेत आहेत. सोबत ऊन पावसाचा लपंडाव देखील पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा आणि खंडाळा परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे. यामुळे पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. अनेक पर्यटक हे निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी परराज्यातून आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, डोंगर-दऱ्याही धुक्यात हरवून गेल्या आहेत. त्यामुळे अवघ्या काही मीटर अंतरावरील व्यक्तीही दिसत नव्हत्या.
लोणावळा आणि खंडाळा परिसरात जून पासून आज अखेरीस एकूण २०८२ मिलिमीटर एवढा पासून झाला आहे. तर गेल्या वर्षी २५५३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस फारच कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तरीदेखील, परिसरातील भुशी डॅम आणि अनेक तलाव हे काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दीदेखील अधिक वाढली आहे. दरम्यान, परिसरात थंड हवा अनुभवायला मिळत असून डोंगरावर धुक्याची चादर पसरलेली आहे. याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अमृतांजन पुलावर येऊन थांबाताना पहायला मिळत आहेत. तेथून अनेक अद्भुत दृश्य पाहायला मिळतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तेथूनच जातो, रेल्वेमार्गही तेथे असल्याने रेल्वेचा आवाज कानावर पडतो. हे सर्व पाहताना आणि अनुभवताना मन हरवून केवळ निसर्गाचा विचार पर्यटक करतो. हेच अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक खंडाळा आणि लोणावळा येथे दाखल होतात.
शनिवार आणि रविवार पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने अनेक जण इतर दिवशी शहरात आणि इतर ठिकणी दाखल होतात. यामुळे वाहतुककोंडी आणि गर्दीपासून बचाव होतो. हे सर्व पाहता पर्यटनाचा आनंद अधिक मिळत असल्याचे पर्यटक सांगतात. भाजलेले आणि तिखट मीठ लावलेले मक्याचे कणीस, लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की याचा आस्वाद आवर्जून पर्यटक घेतात.